स्वातंत्र्यचळवळ



ईस्ट इंडिया कंपनी -
दिनांक ३१ डिसेंबर, १६०० रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात ‘तराजू-तलवार-तख्त असा प्रवास केला. भारतात पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थायिक झाली, तर कंपनीने मुघल साम्राज्यातील प्रदेशात स्वत:चे बस्तान बसविले. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगालची राजकन्या कॅथेरिन ब्रॅगांझा हिच्याशी झाले, तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बंदर  इंग्रजांना हुंडा म्हणून दिले. हा सारा प्रकार म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होते. मुंबई बंदराचा फायदा घेऊन १८१८ ते १८५७ या कालखंडात कंपनीने आपली सत्ता झपाट्याने महाराष्ट्रात पसरविली. सातारच्या प्रतापसिंह महाराजांना फसवून त्यांच्या अंमलाखाली असणारी संस्थाने कंपनीने ताब्यात घेतली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर धोरण राबवून संस्थाने ताब्यात घेतली. एलफिन्स्टनने अत्यंत कुशलतेने मुंबई इलाखा जिंकला. ‘कारकून ते जिल्हाधिकारी’ अशा प्रकारची प्रशासन व्यवस्था एलफिन्स्टनने तयार केली.

१८५० मध्ये लोकांचा कारभारात समावेश असावा म्हणून नगरपालिका निर्माण करण्यात आल्या. कंपनीने १८६१ पासून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमून महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी निर्माण केली. १८९४ मध्ये तुरुंग कायदे येथे आले. ‘कायद्यासमोर सारे भारतीय समान’ अशी इंग्रजांची भूमिका होती. १८३३ मध्ये कायदा आयोग आला व १८३७ मध्ये येथे ‘पीनल कोड’ (दंडसंहिता) लागू करण्यात आला. यातून उतरंड असणारी खर्चिक न्यायालय व्यवस्था उदयाला आली. दिनांक १४ ऑगस्ट, १८६२ रोजी मुंबई हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. भारतीय लोकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यावर बंदी घालण्यात आल्याने महाराष्ट्रातील सरदारांच्या तलवारींच्या विळ्या झाल्या. १८५७ च्या अगोदरच येथे पोस्ट व तारयंत्र सुरू झाले. १८६५ पासून गॅझेटियर तयार करण्याचे कार्य आणि १८७१ पासून जनगणना करण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात रयतवारी, कायमधारा व अन्य महसूलपद्धती इंग्रजांनी आणल्या. इनाम कमिशन नेमून महाराष्ट्रातील ३२ हजार इनामांची चौकशी करून २१ हजार वतने पुरावा नसल्याने जप्त केली, तर काही वतनांची कागदपत्रे जाळून टाकली. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर ब्रिटिशांना महाराष्ट्रात पुढील असंतोषास तोंड द्यावे लागले.

१८१८ मध्ये खानदेशातील भिल्लानी गोदाजी डेंगळे आणि महिपा डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बीडच्या धर्माजी प्रतापरावांचे बंड (१८१८), नांदेडमधील हंसाजी नाईक हटकर यांचा उठाव (१८१९-२०), चितूरसिंग, सत्तू नाईक, उमाजी नाईक यांचा सशस्त्र लढा (१८२६-३१), सावंतवाडीकरांचा लढा (१८२८-३८), कोल्हापूरच्या गडकर्‍यांचा उठाव (१८४४) - महाराष्ट्रात असे अनेक उठाव झाले. परंतु इंग्रजांनी हे उठाव मोडून काढले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात कोल्हापूर, सातारा, मुंबई, खानदेश, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुधोळ येथील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. परंतु नानासाहेब उर्फ धोंडोपंत पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे यांस अपयश आले आणि १८५७ चा लढा अयशस्वी ठरला.

१८७४-७८ या कालखंडात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अन्याय करणार्‍या सावकारांविरुद्ध स्थानिक जनतेने जी बंडे केली ती दख्खन दंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आणण्याच्या विचाराने प्रवृत्त झालेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५-१८८३) यांना इंग्रज सरकारने एडनच्या तुरुंगात मृत्यूपर्यंत ठेवले. या सगळ्यातून महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात आले की आपण ब्रिटिशांविरुद्ध प्रदीर्घ काळ केवळ संघर्ष करू शकत नाही. यातून राजकीय संस्थांचा उदय झाला. ‘हिंदी राजकारणाचा पाया घालण्याचे काम’ करणारी बॉम्बे असोसिएशन दिनांक २६ ऑगस्ट, १८५२ रोजी मुंबईत जन्माला आली. जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी हे संस्थापक. या संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतीयांच्या अडचणी राज्यकर्त्यांच्या कानी घालणे व त्यांचे निराकरण करणे हा होय. याचा पुढचा मैलाचा दगड म्हणजे सार्वजनिक सभा होय. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या सभेने मिठाच्या जाचक प्रश्नावर आंदोलन केले. तसेच मॉरिशसमधील भारतीयांस मदत, दक्षिणेतील शेतकर्‍यांचा कायदा करणे, दुष्काळ समिती, मुद्रणस्वातंत्र्य, स्वदेशी, फेमिन कोडचे भाषांतर या क्षेत्रांत प्रभावी कार्य केले. यामुळेच अखिल भारतीय काँग्रेस संघटनेच्या स्थापनेची पार्श्र्वभूमी तयार झाली. काँग्रेस या शब्दाचा अर्थच मुळी एकत्र येणे! २८ डिसेंबर, १८८५ रोजी काँग्रेसचे १ले अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात भरले. यास उपस्थित असणार्‍या ७२ प्रतिनिधींपैकी मुंबई इलाख्यातील ३८ जण हाते. काँग्रेसच्या कार्यात सुरुवातीला महाराष्ट्रातील दादाभाई नौरोजी, न्या. म. गो. रानडे, फिरोजशहा मेहता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा समावेश होता.
टिळकयुग :
पुढे लोकमान्य टिळक यांनी त्याग व तुरुंगवास आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या द्वारे अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त केले. केसरीतील लेखन, शिवजयंती, गणेशोत्सव, दुष्काळातील कार्य, गीतारहस्याचे लेखन, डोंगरी-मंडाले येथील तुरुंगवास यांमुळे टिळकांना लोकमान्यत्व आणि अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त झाले. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार यांचा पुरस्कार केला. होमरुल लीगला पाठिंबा दिला. टिळकांच्या काळात चाफेकर बंधूंनी पुण्याचा ‘प्लेग कमिशनर’ रँड याची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०४ मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेची पारतंत्र्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी स्थापना केली. सावरकरांच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीवर गोळ्या झाडल्या. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनवर क्रांतिकारक अनंत कान्हेरेंनी गोळ्या झाडल्या. सेनापती पांडुरंग महादेव बापट बॉम्बचे प्रशिक्षण घेण्यास विलायतेला गेले. सावरकरांवर खटला भरून सरकारने त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्यावर पाठवले. विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा शिवराम हरि राजगुरु, बाबू गेनू, हुतात्मा शिरीषकुमार यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि टिळक युगाचा अंत झाला. लोकमान्य टिळक यांच्या काळात ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष आणि राष्ट्रवाद यांचा संपूर्ण भारतात प्रसार झाला.

महात्मा गांधी युग :
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ३१ ऑक्टोबर, १९२० रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियनचे (आयटक) पहिले अधिवेशन मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरले. १९२० च्या काँग्रेच्या नागपूर अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. याच ठिकाणी महात्मा गांधींनी ‘एक वर्षात स्वराज्य’ अशी घोषणा केली. १९२१ मध्ये महाराष्ट्रातील विविध संस्थानांमधील प्रजेच्या हितासाठी ‘दक्षिणी संस्थान हितवर्धक सभा स्थापण्यात आली. याच वेळी इंग्लंडचे युवराज मुंबईला येणार असल्याचे वृत्त येताच त्या विरोधात वातावरण तयार झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापून आपले कार्य पुढे चालू ठेवले. मुंबईत श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशनला मराठी हिसका दाखविण्यात आला. महात्मा गांधी यांच्या मीठ सत्याग्रहाचे महाराष्ट्रात शिरोडा, कोकण, अकोला येथे पडसाद उमटले. सोलापुरात ब्रिटिश विरोधी वातावरण जबरदस्त असल्याने तेथे ४९ दिवस मार्शल लॉ लागू करण्यात आला. मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चौघांना सरकारने फाशीची शिक्षा ठोठावली. महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत विदर्भात जंगल सत्याग्रह, सातारा जिल्ह्यातील बिळाशी सत्याग्रह, नाशिक, रायगड येथे सत्याग्रह झाले. काँग्रेसचे खेड्यात भरविले जाणारे पहिले अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे घेण्यात आले. १९३५ च्या कायद्यानुसार भारतात प्रथमच निवडणुका झाल्या. मुंबई इलाख्याचे पंतप्रधान बाळासाहेब खेर झाले. या सरकारने जमीन महसूल सूट, खेड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रौढ शिक्षण, दारुबंदी, राजबंद्यांची सुटका या क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली. याच दरम्यान कोल्हापुरात भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रजापरिषद चळवळ वाढली. १९४० मध्ये महात्माजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. त्याचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. १९४२ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत पं. नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले. येथेच ‘छोडो भारत आणि चले जाव’ चा नारा प्रकटला. चंद्रपूर, रायगड, अहमदनगर, सातारा येथे जबरदस्त आंदोलने झाली. मुंबईत सरकारी यंत्रणेला समांतर असे गुप्त आकशवाणी केंद्र - आझाद रेडिओ -स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांनी चालविले. सातार्‍याच्या प्रतिसरकारने (पत्रीसरकारने) अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या काळात अतुलनीय कार्य केले. १९४६ मध्ये मुंबईत सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.
स्वातंत्र्य :
दिनांक १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला आणि पुण्यातल्या शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक कायमचा खाली आला. भारत स्वतंत्र झाला, तरी संस्थानांचा प्रश्र्न कायम होता. कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात सामील झाले. मराठवाड्याचा प्रश्न कायम होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसच्या माध्यमातून चळवळ उभारली. सरदार पटेलांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी सैन्य हैद्राबादेत घुसवले. मराठवाडा भाग मुंबई इलाख्याला जोडला. परंतु भारत स्वतंत्र झाला तरी संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अपुरे होते.
0 Responses