शिवोत्तर कालखंड



छत्रपती संभाजी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म दिनांक १४ मे, १६५७ रोजी पुरंदरवर झाला. त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाल्याने आजी जिजाऊसाहेबांनी त्यांस वाढविले. आग्रा प्रकरणात संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी संभाजी राजांस युवराजपदाचा मान देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले. त्यांना आयुष्यात एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. मुघल सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर मराठ्यांकडे सहकार्याच्या अपेक्षेने बंड करून आला असता महाराजांनी त्यास मदत केली. आपल्या तलवारीचे पाणी त्यांनी सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशहा, मुघल यांना पाजले. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब स्वत: दक्षिणेत उतरला. त्याने आदिलशाही-कुतुबशाही नष्ट केली. संपूर्ण भारतात त्याला आता एकच शत्रू उरला होता, तो म्हणजे मराठे! औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने दिनांक १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्र्वर मुक्कामी छत्रपती संभाजी राजांस पकडले. छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. आग्रा येथून सुटका करून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबास डोईजड झाले होते. त्याप्रमाणेच,  मागील इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको व अन्य दोन शाहींप्रमाणेच  मराठ्यांचाही नाश करावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांस ठार मारले. छत्रपती संभाजीराजांस हालहाल करून ठार मारले, ही बातमी कळताच मराठे राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आणि त्यांनी अविरत संघर्ष सुरू केला.
छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई -
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजारामांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी झाला. १२ फेब्रुवारी, १६८९ रोजी ते मराठी राज्याचे छत्रपती झाले. ते रायगड किल्ल्यात मुक्कामी असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजारामांव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे व त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई होत्या. त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले. त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील अन्य मंडळींना कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एक असमान लढा सुरू झाला. औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हा याचा अर्थ राज्याचा आधार) यांनी महाराष्ट्र लढत ठेवला. जिंजीच्या किल्ल्यात छत्रपती राजाराम महाराज असताना झुल्फिकारखानाने त्या किल्ल्याला वेढा दिला. पुन्हा एकदा त्या किल्ल्यातूनही स्वत:ची सुटका करून घेऊन  महाराज महाराष्ट्रात परतले. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण युद्ध जिंकू शकत नव्हता. अशा धामधुमीच्या प्रसंगात छत्रपती राजाराम महाराजांचे दिनांक ३ मार्च, १७०० रोजी निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते.  आता मराठी राज्याची अवस्था विचित्र झाली. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. या वेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. औरंगजेबाच्या प्रत्येक कृतीस महाराणी ताराबाईंनी प्रतिउत्तर दिले. महाराष्ट्रात मुघलांच्या विरुद्ध एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढा सुरू केला. औरंगजेब समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांचे किल्ले घेऊ शकत नव्हता म्हणून त्याने पैसे देऊन किल्ले घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट अत्यंत निराश अवस्थेत दिनांक २० फेब्रुवारी, १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट!
कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक‘माचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
‘‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळा।।’’

सर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी राज्यात फूट पाडण्यासाठी औरंगजेबाचा मुलगा आज्जमशाहने मुघलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची ८ मे, १७०७ रोजी सुटका केली. शाहूराजे स्वराज्यात दाखल होताच अनेक मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला. खेडच्या लढाईत महाराणी ताराबाईंचा पराभव करून शाहू राजांनी दिनांक १२ जानेवारी, १७०८ रोजी सातारा येथे स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला.
0 Responses